Thursday, April 28, 2016

एक अनुभव...


गेल्या शनिवार ला गावातील लग्नानिमित्त नाशिक ला जाने झाले. ८-९ तासांचा प्रवास होता त्यामुळे सकाळी तीन ला प्रवास सुरु झाला. लग्न तसं संध्याकाळच. त्यामुळे दिवस तिथेच जाणार होता. नाशिक ला माझा एक मित्र आहे. तसे ओळखीचे बरेच आहेत. याआधी नाशिक ला बऱ्याच वेळा गेलो पण त्याला काही भेटता आलं नाही. म्हटलं या वेळी त्याला नक्की भेटावं. सकाळी ६ च्या आसपास मी त्याला फोन केला. पण त्याने काही प्रतिसाद दिला नाही. मला वाटलं झोपला असावा. एक-दीड तासाने पुन्हा पुन्हा फोन केला पण प्रतिसाद नाही. सकाळी १०-११ च्या आसपास आम्ही नाशिक ला पोचलो. तेव्हा अजून फोन केला पण काही उत्तर नाही. म्हटलं जाऊ द्या आता. तिथे मंगल कार्यालयात व्यवस्था होती.  दुपारचे जेवण झाल्यावर पंचवटीत फेरफटका मारायला निघून गेलो. एवढा वेळ काय करायचं कारण लग्नाची वेळ होती संध्याकाळची सात वाजता. तिथे मी त्या मित्राला अजून एकदा फोन केला.
एवढे फोन केल्यानंतर तेव्हा त्याचा रिप्लाय आला....
In supervision. Call you later. If urgent, text me.
मी उत्तर दिल....I am in Nashik.
त्याचा रिप्लाय आला...Congratulations. But why are you here?
त्याच्या या उत्तराने मी स्तब्ध झालो. मी विचार केला नाशिक आलो तर congratulation सारखं काय आहे त्यात. आणि But why are you here? हा काय प्रश्न झाला का?
मुळात या उत्तराची अपेक्षा नव्हती. कुणी आपल्याला भेटायला आलं कि आपण लगेच कुठे आहेस, मी येतो, भेटू वगैरे याची अपेक्षा होती. पण झालं उलटंच.
मी त्याला रिप्लाय दिला...Zak marayala aaloy Nashik la.
तिकडून त्याचा मेसेज ...ka re kay jhal?
मी मेसेज केला...salya Nashik la aahe tar why are you here mhanato. माझा पारा सटकला होता त्यामुळे मी काय चांगला रिप्लाय देऊ शकत नव्हतो.
मग त्याचा मेसेज आला...kiti vel aahes ikada? Ghari ye? Are mala vatal interview vagaire aahe ki kay so just asked the reason. Asahi tu baryachda yeto Nashik la pan mala kuth sangato. Mi 5.30 la free hoil. Bhet. Aata kuth aahes. Will call you at 6.00.
मी काहीच उत्तर दिलं नाही. जाऊ द्या म्हटलं. म्हणून त्या मंगकार्यालयात टाईमपास सुरु केला. नाहीतरी लग्नाच्या ठिकाणी कंटाळवाणे होत नाही. वातावरण कसं हिरवेगार, वसंत ऋतू त जशी वृक्षांना पालवी फुटते ना तसं असते.  असे प्रसंग म्हटलं कि सगळे कसे नटून थटून  येतात. प्रत्येकाला वाटते आपण उठून दिसलो पाहिजे. काहीच्या चेहऱ्यावर आनंद, उत्साह तर काही अतिशय गंभीर.  
संध्याकाळी ६.०० ला त्या मित्राचा मला फोन आला. तसा मी अपेक्षित केला नव्हता. म्हटला मी घरी जाऊन फ्रेश होतो आणि तू सांगितलेल्या ठिकाणी भेटायला येतो. मी म्हटलं ठीक आहे. आणि पुन्हा मी मग त्या मंगलकार्यालयात भटकंती सुरु ठेवली. यात एक तास निघून गेला. लग्नाची वेळ झाली होती.  मी मात्र त्या मित्राची वाट पाहत होतो. लग्न लागून झालं. निघायला ४-५ तास बाकी होते. मी त्याला फोन केला. तो म्हटला, मी बाळाला घेऊन हॉस्पिटल ला आलोय. येतो एखाद्या तासात. 
मी जेवण उरकून घेतलं. आणि पुन्हा बसलो त्याची वाट पाहत. तिकडे फोटोसेशन सुरु होतं. वेगवेगळ्या पोझ मध्ये फोटो काढण्याची धावपळ सुरु होती. खूप गर्दी झाली होती. प्रत्येकजण जोडप्याला शुभेच्छा देत होता. मी ते पाहत बसलो.
८ वाजे च्या आसपास मी त्याला पुन्हा फोन केला. म्हटलं अरे कधी येतोय. त्यावर तो म्हटला, अरे मी खूप थकलोय. आता खूप उशीर झालाय. मला यायला अर्धा-पाऊन तास लागेल. त्यापेक्षा तूच ये माझ्याकडे. उद्या सकाळी जा.
त्याचं बोलणे झाल्यावर मी म्हटलं...पाहतो आणि मी फोन कट केला.
त्यानंतर ना त्याने मला फोन केला आणि ना मी त्याला.
रात्री १२.०० च्या आसपास आमचा परतीचा प्रवास सुरु झाला आणि सकाळी ६ च्या आसपास घरी पोचलो.
कालचा दिवस भूतकाळात जमा झाला. काही गोष्टी तिथेच सोडून द्यायच्या असतात. मी त्यावर विचार हि केला नाही. भेटणे न भेटणे हा ज्याचा त्याचा प्रश्न. आपण अपेक्षा करू नये. आता प्रत्येक मित्राच्या बाबतीत असं होते असं नाही. काही तर वेळेआधी आपल्याला घ्यायला येतात आपण येत असलो कि.
जुने मित्र भेटले कि भूतकाळातल्या आठवणी जाग्या होतात. इकडची-तिकडची विचारपूस होते. बाकी काही नाही.
(प्रसंग जसा घडला तसा शब्दबद्ध केलाय. सौंदर्यीकरण केलेलं नाही.)

सचिन भगत 

Wednesday, April 27, 2016

Marriage@1Year

लग्न होऊन एक वर्ष पूर्ण झालं आज. त्यानिमित्ताने काही गोष्टी शब्दात उतरवण्याचा प्रयत्न केलाय.
लग्न हा प्रत्येकाच्या जीवनातील महत्त्वाचा टप्पा. २८ एप्रिल २०१५ ला मी विवाहबद्ध झालो. अरेंज्ड मरेज. आज एक वर्ष पूर्ण झालंय. दोघांनी संसार सुरु केला आणि वर्षभरात दोघांचे तीन झालेत. मागे वळून पाहताना अनेक चढ-उतार दिसतात. दोन व्यक्ती...पूर्वी कधीही न भेटलेले... एका बंधनात बांधले गेलेत. एकमेकांचा स्वभाव ओळखण्यात कित्येक दिवस निघून गेलेत.
पूर्वीसारखं आयुष्य राहिलं नाही. बंधने आलीत. जबाबदार्या वाढल्यात. पण तडजोड जास्त नाही केली.  दोन लोकं म्हटल्यावर भांड्याला भांड वाजणारच...ते आमच्यातही झालं. पण ते तेवढ्यापुरतं. ताणल नाही.
साखरपुडा...घर ...लग्न...आणि अपत्य....१०-१२ महिन्यात सर्वकाही. सगळं कसं झटपट होतं गेलं. त्यामुळे मला स्वतःला बदलायला वेळ मिळालाच नाही. खरा प्रवास अजून सुरु व्हायचाय. हि तर सुरुवात होती.
आयुष्य मात्र बदललं आहे. ठराविक वेळेला घरी पोचलोच पाहिजे. नाहीतर फोन सुरु होतात. थोडा उशीर झाला म्हणजे, कुठं होतात. काय काम होतं. अश्या असंख्य प्रश्नांचा भडीमार आणि उत्तरे उत्तरं देताना माझी उडालेली तारांबळ. हे चित्र नेहमीचं. त्यानंतर कुठे चहाचा कप हातात येतो. त्यातही आपल्याला हे पाहिजे, ते पाहिजे. कधी जायचं मार्केट ला. माझं उत्तरं मात्र एकच..जाऊ नंतर. नंतर कधी ते निश्चित नसतेच. टोलवा -टोलवी दुसरं काय?
पूर्वी बाहेर पडलो कि परतीची ठराविक वेळ नव्हती. कधीही आणि कुठेही. मनसोक्त स्वातंत्र्य.  
जीवनाची हीच तर खरी मजा आहे. आपण प्रत्येक गोष्टीला ‘हो’ म्हणायचं आणि जे करायचं आहे तेच करायचं. त्या फक्त ‘हो’ या एका शब्दाने येणारे प्रश्न नाहीसे होऊन जातात.
वेळेवर सगळ्या गोष्टी मिळतात त्यामुळे जीवनात बरीच शिस्त आलीये. नाहीतर शिस्तीचा आणि आपला काही संबंध नव्हताच.
एखाद्या वेळेस भाजी चांगली नाही लागली तरी खूप छान होती असं सांगावं लागतं. कारण खरं सांगितलं तर तिकडून उत्तरं तयार...तुम्हाला बाहेर खायची चटक लागली आहे. त्यामुळे घरच कसकाय चांगलं लागणार? एवढी छान भाजी तर होती. पैसे जास्त झालेत तुमच्याकडे. म्हणून हे असं होतंय.....आता हे सर्व पुराण टाळण्यासाठी खोटं बोलणे हा सर्वोत्तम पर्याय.  कुठे खरं बोलावं आणि कुठे खोटं याचा आता बराच अनुभव आलाय. त्यामुळे सहसा वाद होत नाहीत.  खरं समजून घेतलं जात नाही आणि खोट्याला डोक्यावर नाचवलं जातं. सुरुवातीला मी प्रत्येक गोष्ट खरी सांगत होतो पण त्याचा उलट परिणाम व्हायचा. म्हणून ते आता कमी केलंय. मी एकटा नाही सगळेच तेच करतात.
कमी जेवण केलं तर तिकडून हि समस्या. आता भूक काय नेहमी सारखी असते का? नेहमी पेक्षा कमी खाल्लं म्हणजे “काय खाऊन आलात बाहेर? म्हणून तर जेवण जात नाहीये. आता हे उरलेलं तुम्हीच खायचं सकाळी.” आपण फक्त नेहमीप्रमाणे ‘हो’ म्हणायचं. पण ते खाण्याची वेळ काही आली नाही.  कधी कधी जबरदस्तीने जास्त जेवण करायची सवय झाली आहे भूक नसली तरी.
भिन्नतेचा आदर केला तर कुठलंही नातं टिकून राहते. आपल्या गोष्टी लादायच्या नाहीत आणि लादलेल्या गोष्टी स्वीकारायच्या नाहीत. हे तत्त्व मी पाळत आलोय. प्रत्येकाचं व्यक्तिमत्त्व सारखं असू शकत नाही. त्यामुळे समोरच्याने माझ्यानुसार वागायला पाहिजे असं वाटणं म्हणजे मूर्खपणा. पर्सनल स्पेस ज्याची त्याला द्यायलाच हवी. त्यामध्ये आपले अतिक्रमण नको. अन्यथा प्रश्न निर्माण होतात. त्त्यापेक्षा प्रश्नच निर्माण होऊ द्यायचे नाहीत म्हणजे उत्तरं शोधण्याची गरज पडणार नाही. सगळे वादविवाद तासाभरात संपून जातात. पण ते माझ्यामुळेच होतात असं नेहमीचं उत्तर.
मला सहसा औपरीचाकता आवडत नाही. तिला मात्र त्यात भरपूर इंटरेस्ट. कधी कधी इच्छा नसतानाही त्या पार पाडाव्या लागतात. नातं टिकून ठेवायचं म्हणजे या गोष्टी आल्याच. वाढदिवस, सण, नवीन वर्ष किंवा कुठलाही प्रसंग असो मी सहसा कुणाला शुभेच्छा देत नाही. जवळच्या नात्यांमध्ये औपचारिकतेची गरज नाही असं माझं मत आहे. माझे दोन मित्र आहेत. ते आणि मी कधीही एकमेकांना शुभेच्छा द्यायला फोन करत नाहीत.  चुकून एखाद्याच्या वाढदिवशी फोन केला तरी त्याबद्दल ब्र शब्द हि काढत नाही.  बरं आम्हाला कधी गिफ्ट द्यायची सवय नाही. त्यामुळे अडचणीत अजून भर पडते. वेळेनुसार ते हि आत्मसात होईल अशी अपेक्षा आहे. आणि तिच्या माझ्याकडून असलेल्या अपेक्षा हि पूर्ण करण्याचा प्रयत्न सुरु आहे.
(गिफ्ट चा विषय निघाला म्हणून: - माझा एक जवळचा मित्र. तो गिफ्ट देतो फक्त मुलींना. कुणाला पुस्तक, कुणाला मोबाईल आणि अजून काय असेल ते माहित नाही. एक नंबरचा ढोंगी आहे. खरं कधीच सांगत नाही. अंगावर आलं कि मग सांगतो. पण त्याचं दुर्दैव असं कि त्याने काही अश्या भेटवस्तू कुणाला दिल्या कि आम्हाला माहित होतेच. मग सुरु होते खेचाखेची.)
आयुष्याच्या प्रत्येक वळणावर मनुष्य बदलत जातो. आसपासच्या कित्येक लोकांमध्ये हा बदल पाहिलाय. लग्नापूर्वी आणि लग्नानंतर या दोन टप्प्यात प्रत्येकजण वेगळा आढळून येतो. स्वतःची जबाबदारी ओळखून पार पाडण्याचा प्रयत्न करतोय.


तिचंही आयुष्य बदललं आहे. माझ्यासारख्या व्यक्तीसोबत जुळवून घेतलंय तिने. काही झालं तरी अंतर देत नाही. मला काय आवडते आणि काय नाही याचाही अभ्यास झालाय तिचा. सर्व गोष्टी वेळेवर मिळतात.
मुलगा हा बायको आणि आईवडील यांच्यातील दुवा. स्वतःला त्याला यात संतुलन ठेवावं लागते. नाहीतर त्रास त्यालाच.  हे मी जाणून आहे. त्यामुळे कुणाला काय सांगावं आणि किती सांगावं याचं सतत भान ठेवावं लागते.काही गोष्टींकडे दुर्लक्ष करावं लागते एका मर्यादेपर्यंत. कधी-कधी एक पाऊल मागे घेणच चांगलं.  जीवन जगण्याची माझी संकल्पना फार सोपी आहे. प्रत्येक क्षण सुखासमाधाने घालवायचा एवढंच ध्येय. आणि हेच मी तिला नेहमी सांगत असतो. त्यात मी यशस्वी व्हावं एवढीच मनिषा.
(हे लिखाण म्हणजे एकच बाजू आहे. जाणूनबुजून तसं केलंय.)

-सचिन भगत 

Monday, April 11, 2016

ती आणि तो...

दोन-चार दिवसांपूर्वी एक मित्र भेटला. नागपूर च्या एका प्रतिष्ठित महाविद्यालयात सहायक प्राध्यापक. मुळचा तो औरंगाबाद चा. शिक्षण जळगाव आणि पुण्यात तर नौकरी नागपूरला. रेल्वे स्टेशन वर त्याला भेटायला गेलो होतो. त्याच्या काही मित्रांसोबत तो शेगाव ला महाराजांच्या दर्शनासाठी आला होता. छोट्याश्या भेटीत त्याने त्याचे काही अनुभव सांगितले. त्याचा एक अनुभव फक्त शब्दबद्ध केलाय त्याच्या परवानगीने. वास्तवाला थोडी कल्पनेची जोड दिलीय. अनुभव त्याचा असल्याने प्रत्येक गोष्टीवर प्रकाश टाकू शकलो नाही.
त्याच्याच शब्दात.....

तब्बल  दहा वर्षानंतर फेसबुक ला सापडली. किती बदलली होती ती. आनंद शब्दात व्यक्त करता येत नव्हता.
किती शोधलं तिला. वेड्यासारख.....2006 मध्ये शेवटची भेटली होती. अनेक गोष्टी तिला सांगायच्या होत्या. पण हिम्मत झाली नाही. काही तरी मिळवल्यानंतर बोलू असं वाटलं. पण काय तिचं लग्न झालं. आणि सगळं संपलं. ती मनाच्या कोपर्यात कुठतरी दडलेली होती. त्यामुळे आठवण तर यायची.

माझं तुझ्यावर प्रेम आहे हि सांगायची संधी पण तिने दिली नाही. पुण्यात गेल्यानंतर जळगाव ला येणं शक्य नव्हतं. खरं तर मला तिच्यासाठीच पुण्याला जायचं नव्हतं. पण जाण्याशिवाय पर्याय नव्हता. हळू हळू संपर्क कमी होत गेला. नंतर तोही  कुठतरी लुप्त झाला.
मी पण माझ्या कामात मग्न झालो होतो. कित्येक वेळा फेसबुक ला शोधलं.  पण सापडलीच नाही. फेसबुक ला ती नव्हतीच.
आज तिची खूप आठवण येत होती. म्हणून सहज फेसबुक वर सर्चिंग केलं. तर अचानक सापडली.  गेल्या ४-५ वर्षांपासून शोधतोय पण सापडेना.
आज  तिचा फोटो पाहायला मिळाला. तिला पाहण्याची उत्सुकता तर होतीच. पूर्वीपेक्षा खूप जाड झालीय. हसतमुख चेहरा मात्र तसाच. त्या चेहऱ्याने मला वेड लावलं होतं. आज तिचा फोटो पहिला. आणि सगळ्या भूतकाळातल्या आठवणी जाग्या झाल्या. साडीमध्ये छान दिसते. कसं सांगू मनातल्या भावना. कुठं  नाही शोधलं. जीव  कासावीस झाला होता.
२००३-४ ची वेळ. तिची आणि माझी पहिल्यांदा भेट झाली. ती पण  एका लेक्चर ला. ती कुना सोबत पण बोलत नव्हती. मुलांपासून दूर रहायची. कदाचित मुलं कशी असतात याची जाणीव असावी तिला.
मला निमित्त हव होतं. मी जाणूनबुजून लेक्चर ला गेलो नाही. ५-७ विद्यार्थी असायचे फक्त.
मला नोट्स पाहिजेत. तर नाही म्हटली.
माझा इगो दुखावला गेला. नकळत मी तिच्याकडे ओढला गेलो. संधीची वाट पाहत होतो. कित्येक वेळा बोलण्याचा प्रयत्न केला पण काही केल्या दाद देईना.
मी कधी कुणाला नोट्स मागितल्या नाहीत. सगळे माझ्याच नोट्स वापरायचे. मी फार वक्तशीर होतो.  कुठलाही लेक्चर मिस करत नव्हतो.
एकदा ती एक आठवडा आलीच नाही.
एके दिवशी तिने मला नोट्स मागितल्या.
मी देऊन टाकल्या.
 दोन तीन दिवसानंतर तिने नोटबुक परत केली.
छान अक्षर आहे म्हणे तुझं.
खरं तर फक्त तिच्यासाठी नोट्स व्यवस्थित ठेवत होतो. तिला प्रभावित करायचं होत. आणि माझा उद्देश सफल झालाही.
तिथून सुरुवात झाली आमच्या मैत्रीची. रोज भेटणं असायचं.
वर्गात कमी आणि बाहेर जास्त हे समीकरण झालं होतं. तासंतास गप्पा चालायच्या. हळू हळू बाहेर हॉटेल ला जायला लागलो.  ती नसली कि खूप असायचं डोक्यात. पण ती समोर आली कि मी मात्र शांत. मला शब्द सापडत नव्हते. काय बोलावं हे सुचत नव्हतं.
आमचं एकमेकांवर प्रेम होतं. पण ते कधीच व्यक्त झालं नाही. काळाच्या ओघात ते हृदयाच्या कोपर्यात साठवलं गेलं.
slam बुक मधला तिचा तो पासपोर्ट फोटो नेहमी निहाळत होतो. फक्त तिच्यासाठी slam बुक तयार केलं. औपरीचाकता म्हणून इतरांचे पण मत घेतेलेत त्यात.
आता ती आपल्या ला भेटणार नाही. तिचं लग्न झालंय. खूप दूर राहते. भेट तर शक्यच नाही.
जळगाव सोडताना अजूनही आठवते ती शेवटची भेट. २-३ तीन तास गप्पा मारत होतो आम्ही. कुणालाही जायची इच्छा होत नव्हती.
मला विसरणार तर नाही ना हे तिचं भावनिक वाक्य काळजाला छेद करून गेलं. तिच्या चेहऱ्यावरच्या भावना सगळं काही सांगत होत्या. आता कसं सांगू तिला कि तुझ्याशिवाय आयुष्याची कल्पना करवत नाही.
जाताना तिचा तो हातातला हात सोडवेना. पहिला आणि शेवटचा शेकहंड.
तो हाताचा स्पर्श अजूनही स्मरणात आहे. ती गाडीवर बसून निघून गेली. मी मात्र तिला पाहत राहिलो एकदा तरी मागे वळून पाहिलं या आशेने. कॉलेज च्या गेटजवळ ती दिसेनाशी होईपर्यंत पाहत राहिलो.
माझं आयुष्य सुरु झालं होतं तिच्याविना. आता ती नाही भेटणार रोज या ची वेदना होत होती.
नकोच जायला पुण्यात. पण भविष्याचा विचार डोक्यात येत होता. म्हणून पुण्यात गेल्यानंतर हि मी रमलो नाही. थोडक्यात पुणेकर झालो नाही.
मला परत यायचं होतं फक्त तिच्यासाठी. नशिबात मात्र काही वेगळंच होतं.  माझं यश लांबत गेलं. तिनं वाट नाही पहिली आणि संसाराला लागली.
माझी स्वप्ने उद्धवस्त झालीत. मला पुढे जायचं होतं तिच्याविना. मनाची समजूत काढली. लग्न केलं तर नाही कळवलं तिने. कदाचित ती धाडस नाही करू शकली. ५-६ महिन्यानंतर कळलं कि ती विवाहबद्ध झालीय.
तेव्हा मोबाईल नव्हता. फेसबुक चा परिचय नव्हता.

एक मध्यमवर्गीय मुलगी. एवढ्या कॉलेजात फक्त मीच तिचा मित्र. माझं  तिच्यावर प्रेम होतं. भेटी गाठी खूप व्हायच्या. बोलणे नेहमीच. तिला  मनातलं सांगू शकलो नाही. फक्त एवढीच खंत होती.

फेसबुक नसतं तर कदाचित तिला पाहायला पण मिळालं नसतं. सहवासात राहून आमचं प्रेम बहरलं. एम जे ची मानव विद्या इमारत कशी विसरता येईल. तिथं कट्ट्यावर बसून एकमेकांशी ओळख अधिक चांगल्या पद्धतीने झाली.
मी एकदा असंच कामानिमित्त भुसावळ ला गेलो होतो. दोन दिवसानंतर परत आलो तर ती बोलायला तयार नव्हती. न सांगता गेल्याचा तिला राग आला होता. कसंतरी मी तिचं मन वळवलं होतं. कुणीतरी अधिकाराने बोलते याचा फार आनंद झाला.
मैत्री नंतर आमचं प्रेम बहरत गेलं. प्रेमाचा वसंत ऋतू सुरु झाला होता. तिच्या सानिध्यात दिवसामागून दिवस जात होते. आयुष्य रंगीन झालं होतं. स्वप्नांनी रात्री सजून जायच्यात. बायको म्हणून तिची प्रतिमा कायम नजरेसमोर यायची. अजूनही लग्न करू शकलो नाही. घरून लग्नासाठी दबाव वाढत चालला आहे. सरकारी नोकरी असल्याने अनेक संबंध चालून येत आहेत. किती काळ नकार द्यायचा आता.
महाविद्यालयीन जीवन म्हणजे मृगजळ. कुणाच्या हाताला लागतं, कुणाच्या नाही. आयुष्यात पहिल्यांदा प्रेमाचा अनुभव घेत होतो.  
आपलं भविष्य काय? याची चिंता कायम लागून रहायची. म्हणून पुण्याला जायचा निर्णय घेतला.
आयुष्यात जर तर ला  महत्त्व नाही. एक छोटंसं समीकरण जुळवायचा प्रयत्न करत होतो. ती आणि मी. पण समीकरण अपूर्ण राहिलं. तिने दिशा बदलली तर मी दिशाहीन झालो. आयुष्य बदललं आहे. कॉलेजात मुलं-मुली घोळक्याने पाहताना मला ते सगळं आठवतं. भूतकाळाला आठवणीच्या कप्यात बंद करून पुढे निघालो.
अनेक आठवणींना उजाळा देत असताना ट्रेन ची वेळ कधी झाली ते समजलंच नाही. ट्रेन आली आणि तो निघून गेला.  पण त्याची हि कथा मला काही स्वस्थ बसू देईना. संध्याकाळी मी त्याला फोन केला आणि हा अनुभव शब्दबद्ध करण्याची परवानगी घेतली नाव न लिहिण्याच्या अटीवर.

हे लिखाण फक्त त्याच्या आठवणीतील तिच्यासाठी....तिची आठवण म्हणून.                                                      
-सचिन भगत