काल माझ्या एका
मित्राचा फोन आला. मी जेवण करत होतो. मी नंतर फोन करतो असं म्हटलं. तो म्हटला,
नक्की कर, मला महत्त्वाचं बोलायचं आहे. त्याला काय सांगायचं या विचार करत मी
घाईघाईने जेवण संपवलं आणि घराबाहेर पडलो. त्याला फोन केला आणि आमचं बोलणं सुरु
झालं. पुढे मी फक्त ऐकण्याचं काम केलं. तो जे काही बोलला ते त्याच्याच शब्दांत...
मला एक वर्ष झालं पुण्यात येऊन. पुणे विद्यापीठात एम.एस.सी. ला प्रवेश
मिळाल्याने मी खूप आनंदात होतो. विभाग पण छान वाटत होतो. सगळं व्यवस्थित सुरु
होतं. मी भविष्याची स्वप्ने रंगवायला सुरुवात केली होती. सहसा मी मुलांमध्ये मिसळत
नव्हतो. आपण इथं का आलो आहे याची मला पूर्ण जाणीव होती. म्हणून सकाळी लवकर उठून
सरळ ग्रंथालयाकडे माझी पावले वळत होती. विभागात लेक्चर संपल्यावर पुन्हा जयकर. असा
माझा दिनक्रम होतं. पण कुणास ठाऊक होतं कि शांततेत चाललेल्या माझ्या जीवनात वादळ
येईल म्हणून. ती शांतता हि मला आवडायला लागली होती. मी मितभाषी असल्याने फार मित्र
नव्हते. कॅन्टीन कधी तासभर बसलो नाही कि निसर्गरम्य एलीस गार्डन मध्ये कधी गेलो
नाही. कधी मन लागत नसलं तर एकटाच चतुश्रुंगी च्या टेकडीवर तासनतास बसून राहायचो.
किती छान वाटत होतं ते. संध्याकाळ झाली कि पुणे किती सुंदर दिसायचं. सगळं शहर
उजळून निघायचं. तर कधी त्या कातरवेळी माझ्या जीवनात हि तो प्रकाश लवकरच येईल याचा
आभास देऊन जायचा. तो उजेड मला आशेचा किरण वाटत होता. मी वेगवेगळे अर्थ काढत
असायचो. नकळत बाजूला बसलेल्या जोडप्यांकडे लक्ष जायचे. लोकं किती मग्न असतात
त्यांच्या कामात. आपल्या बाजूला कोण आहे याचं हि भान त्यांना राहत नाही. इथे कुणीच
कुणाची तमा बाळगत नाही. माझ्या शहरात तर असं कधी पाहायला मिळालं नाही. नकळत माझं शहर आणि पुणे याची तुलना हि व्हायची. पुण्यात
विद्यापीठात शिकत असल्याचा अभिमान वाटायचा. तो घरी गेलो कि पुण्यातल हे मित्रांना
सांगायची मजा काही औरच. सगळं कसं मजेत चाललं होतं.
विभागात जाऊन मला दहा-पंधरा दिवस झाले असतील. माझ्या वर्गातील एक मुलगी नेहमी
माझ्याकडे पाहत रहायची. मी तिकडे दुर्लक्ष करत गेलो. याआधी कधी कुण्या मुलीशी
बोललो नाही कि कुणी मैत्रीण हि नाही. बरं मी कुण्या मुलीशी पण बोलत नव्हतो.
विद्यापीठात घोळक्याने राहणाऱ्या मुला-मुलींमध्ये हि मी कधी गेलो नाही. मग हि
माझ्याकडे का पाहते असते? मुलगी खूप सुंदर.
त्यामुळं माझाच काहीतरी गैरसमज होतो असं वाटलं. दिवसामागून दिवस जात राहिलेत.
अजूनही ती माझ्याकडेच पाहत होती. मग याला गैरसमज तरी कसा समजू. कधी वाटलं तिला
जाऊन विचारावं. पण ती हिम्मत कधी झालीच नाही. हळू-हळू मुलांमध्ये याची चर्चा सुरु झाली.
ती सुंदर असल्याने खूप मुले तिच्या मागे होती. एक-दोन जणांनी तिला प्रपोज हि केलं.
ती सरळ नाही म्हटली त्यांना. ती माझ्याकडे पाहते याची चर्चा पूर्ण विभागात झाली.
हळू-हळू हे प्रकरण काही तिच्या गावाच्या विद्यार्थ्यांनी तिच्या आई-वडिलांपर्यंत
पोचवलं. मला यातलं काहीच माहित नव्हतं. एके
दिवशी त्या मुलीचे नातेवाईक विद्यापीठात आलेत. मी अनिकेत कॅन्टीन कडे जात होतो.
त्यांनी मला मध्येच गाठलं. माझ्या वर्गातील काही मुलंही त्यांच्यासोबत होती. आमच्या मुलीचा नाद सोड
नाहीतर महागात पडेल असं बरंच काही बोललेत ते. मी त्यांना खूप सांगण्याचा प्रयत्न
केला पण त्यांनी माझं ऐकून घेतलं नाही. माझ्याबाजुने कुणीच नव्हतं. आयुष्यात
पहिल्यांदा मित्र असायला पाहिजे याची जाणीव झाली. काही वेळानंतर ते निघून गेलेत.
पण मी फार घाबरलो होतो. आजपर्यंत मी कुणाच्या घेण्यादेण्यात हि नव्हतो. माझं
कुणाशी भांडण झाल्याचंही मला आठवत नाही. मी तसाच रूम ला गेलो तर ते पुन्हा कधी
विभागात न येण्यासाठीच.
नोव्हेंबर महिना होता तो. सेमिस्टर ची परीक्षा जवळ आली होती. घराबाहेर पहिल्यांदा
बाहेर पडलो होतो. जगाचा अनुभव नव्हता. फार कुणात कधी मिसळलो नाही. सामाजिक ज्ञान
कधी आलं नाही त्यामुळे. मी स्वतः मध्येच गुरफटलो होतो. प्रश्न होता त्या मुलीचा.
हळू-हळू मलाही ती आवडायला लागली होती. दिवसरात्र तिचाच विचार करत होतो. दिवसभर रूम
ला पडून असायचो. अभ्यासात मन लागत नव्हतं. माझी मानसिक स्थिती ढासळत गेली. तिच्याशी
मी कधीच बोललो नाही आजगायात. याला प्रेम म्हणावं कि आकर्षण. सुरुवातीला वाटलं हे
आकर्षण चं आहे. पण मग इतर भरपूर मुली असताना मी तिचाच का विचार करतो.
या विचारप्रक्रियेत मी अभ्यास कधी सोडून दिला ते कळलंच नाही. परीक्षा जवळ आली
होती. मी परीक्षेला गेलोच नाही. परीक्षा तर सोडा मी नंतर कधी विभागात गेलोच नाही.
मी परीक्षेला गेलो नाही म्हणून तिने पण परीक्षा दिली नाही. निकाल लागला तेव्हा
कळाल कि तिचे पण सगळे विषय बाकी आहेत म्हणून. दोघेही फेल. तिने परीक्षा
माझ्यामुळेच दिली नाही हे मात्र नक्की होतं. तिचं हि माझ्यावर प्रेम आहे हे ठाऊक
झालं होतं. पण तिला सांगणे कधी जमलं नाही. एक वर्ष निघून गेलं आता. मी दुसरे
सेमिस्टर ची परीक्षा पण नाही दिली. एक वर्ष ड्रोप केलंय. पुन्हा प्रवेश घेतला आता
पहिल्या वर्षाला. घरी सांगायची हिम्मत नव्हती म्हणून मामा ला फोन करून सगळं
सांगितलं.
मामा वडिलांना भेटायला गेला. वडील बांधकाम काम करतात. दिवसाला २००-३०० रुपये
मिळतात. मामा भेटायला सरळ त्यांच्या कामाच्या ठिकाणी गेला. त्यांना घेऊन एका हॉटेल
ला गेला आणि चहा सांगितला. सगळा प्रसंग सांगितला. वडील रडायला लागले. त्यांच्या
डोळ्यातले अश्रू थांबत नव्हते. दिवसभर राब राब राबून बाप पैसे पाठवतो. ओवरटाईम
करतो कारण मला दर महिन्याला पैसे पाठवावे लागतात. बापाचं अवसान गळालं होतं. मामानं
कसाबसा धीर दिला. काय चाललं असेल त्याच्या मनात. काम करताना प्रत्येक क्षण माझा
विचार करत असेल. मुलगा शिकतोय तर किती अपेक्षा असतील. अंग मेहनतीचं काम असून पण
कधी खाडा टाकला नाही बापानं मी पुण्यात आल्यापासून. मी सांगू तरी काय सांगू
त्यांना. कसं समजावू त्यांना. तो कि किती खचला असेल. पण बाप तो बाप. त्याने
काळजावर दगड ठेवून हे पचवलं असेल. संध्याकाळी फोन केल्यावर बाप काहीच बोलला नाही
त्याबद्दल. फक्त अभ्यास कर म्हटला. जे झालं ते विसरून कामाला लाग.
मला माझीच लाज वाटत होती. मी काय करून बसलो हे. आता पुन्हा नव्याने सुरुवात.
आयुष्यातलं एक वर्ष वाया घालवलं मी. कुणासाठी आणि कशासाठी. बापच्या कष्टाच्या
पैश्याचं मी चीज नाही केलं. त्यांनी पाठवलेल्या प्रत्येक नाण्यात त्यांची मेहनत
होती. माझ्याकडे किती अपेक्षेने पाहतात ते. आईला काही काळात नाही. ती बिचारी
साधीभोळी. तिला याचा गंध हि नाही. मला यातून बाहेर पडायचं आहे.
असं त्याने खूप काही
सांगितलं. मला काय बोलावं कळत नव्हतं. तो असं काही करेल मला कधी वाटलं नाही. रात्री मला कितीवेळ झोप नाही लागली. मला एवढं
वाटलं तर त्याच्या वडिलांना किती वाईट वाटलं असेल. कसं सावरलं असेल त्या माणसाने
स्वतःला. असे नानातऱ्हेचे विचार माझ्या मनात घोळत होते. या प्रसंगाचा विचार करता
मला कधी झोप लागली ते कळलंच नाही. सकाळी उठलो ते कॉलेज ला जाण्यासाठीच.
प्रेम कि आकर्षण कि
अजून काही. मला कळायला मार्ग नाही. त्याला समजवायला माझ्याकडे शब्द नाहीत.
प्रेम होतं तर तिला
सांगायला तर पाहिजे होतं. कुणाचा दोष असेल यात. त्या मुलीचा कि याचा. एक वर्ष वाया
गेल्याने त्याची काय स्थिती असेल. त्याचं मन कुठं असेल. अशी अनेक मुलं पुण्यात
स्वप्न घेऊन जातात. कुणाची स्वप्ने प्रत्यक्षात येतात कुणाची अधांतरी राहतात.